वुत्तसंस्था : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेच. याच नीरज चोप्राने देशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग मध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेक करत त्याने हे स्थान मिळवलं. सिझनमधला हा त्याचा दुसरा विजय आहे. याआधी दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर भालाफेक करत नीरजने पहिलं स्थान मिळवलं होतं. नीरज चोप्राने ५ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर आता लॉसने डायमंड लीगमध्ये त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एफबीके गेम्स आणि पावो नूरमी गेम्स या दोन्ही स्पर्धांमधून नीरज चोप्राने दुखापत झाल्यामुळे माघार घेतली होती.
नीरज चोप्राने या लीगच्या पाचव्या फेरीत ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेकला आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या फेरीत त्याने फाऊलने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर ८३.५२ मीटर आणि ८५.०४ मीटरवर त्याने भाला फेकला. चौथ्या फेरीत नीरजकडून आणखी एक फाऊल झाला. पण पुढच्या म्हणजे पाचव्या फेरीत ८७.६६ मीटर अंतरावर नीरजने भाला फेकला. त्याची बरोबरी कुणीही करु शकलं नाही. त्यामुळे नीरजने डायमंड लीग पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. २०२३ या वर्षात आपल्याला भालाफेक स्पर्धेत ९० मीटरचा टप्पा ओलांडायचा आहे असं त्याने सांगितलं होतं. मात्र यासाठी कुठलाही दबाव आपल्यावर नाही असंही तो म्हणाला होता. नीरजची आत्तापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर इतकी आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत नीरजनं इतिहास रचला होता. भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भुत प्रवास सुरू आहे.