रायगड : विधानसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३२४ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून २४० आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख ५८ हजार ५३१ लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी १ लाख ९० हजार ४९७ आहे. विधानसभा निवडणुक-२०२४ आचारसंहिता कालावधीत या विभागाची सात पथक तैनात असून पथकांकडून आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हयात बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरीता रायगड विधानसभा मतदारसंघात शेडूंग, ता. पनवेल व चांढवे, ता. पोलादपूर येथे २ तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपर्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असून अशा हॉटेल, ढाबे मालक-चालक यांच्यासह जागा मालकांवर गुन्हे नोंद करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच या निवडणूक कालावधीत गोवा राज्यातून गोवानिर्मित मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या रो-रो सेवेव्दारे वाहतूक होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेव्दारे येणार्या वाहनांची पोलीस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटसप क्रमांक ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे.