मुंबई : आपल्या धडाकेबाज, पारदर्शक आणि कठोर कार्यपद्धतीमुळे कायम चर्चेत राहणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर भेसळीविरोधात मोठी मोहीम उघडली असून दूध, पनीर, खवा, मिठाई तसेच हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ निर्मिती केंद्रांवर सातत्याने कारवाई केल्याने भेसळ माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आक्रमक आणि नियमांवर आधारित कामकाजामुळे अनेक नागरिक त्यांची तुलना ‘नायक’ चित्रपटातील मुख्यमंत्र्याशी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका डिजिटल पॉडकास्टमध्ये त्यांना ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ झाल्यास काय कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत कोणालाही अमर्याद अधिकार नसतात. आपण एक शासकीय कर्मचारी असून समाजाला प्रगतीच्या सर्वोच्च स्तरावर नेण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच आपले कर्तव्य आहे. समाजाला योग्य दिशा देणे, त्याला सक्षम करणे आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. समाज जितका विकसित होईल तितका देश आणि प्रत्येक नागरिक अधिक सक्षम व आनंदी होईल, असेही त्यांनी नमूद केले. कोणतीही जबाबदारी मिळाल्यानंतर प्रत्येक दिवशी कामाचा दर्जा आणखी एक पाऊल पुढे कसा नेता येईल, यावरच आपला भर असतो. त्यासाठी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि उद्दिष्टपूर्ती यालाच आपण सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकांकडून ‘नायक’ चित्रपटातील नायकाशी केली जाणारी तुलना स्वीकारताना तुकाराम मुंढे यांनी नम्र भूमिका मांडली. आपण एक शासकीय सेवक असून आपल्या अधिकारांच्या आणि मर्यादांच्या पूर्ण जाणीवेत राहून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी प्रेमाने ‘नायक’ म्हटल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले, मात्र स्वतःला केवळ चांगला अधिकारी म्हणून नव्हे तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारा अधिकारी म्हणून ओळख मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘नायक’ चित्रपटातील शिवाजी गायकवाड हे पात्र आपल्यालाही आवडल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २१ वर्षांच्या सेवेत २४ पेक्षा अधिक वेळा झालेल्या बदल्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बदली ही प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. आपण कोणत्या पदावर किंवा कोणत्या ठिकाणी कार्यरत आहोत यापेक्षा त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शंभर टक्के प्रामाणिकपणे काम करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियावर तयार झालेल्या त्यांच्या ‘सिंघम’ प्रतिमेबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपण कधीही प्रयत्न करत नाही किंवा सोशल मीडियावरील कौतुकामुळे प्रभावित होत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेला न्याय मिळवून देणे आणि प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणे, यावरच आपला संपूर्ण भर असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.







