पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात न्हाहून गेलं. अंदाजे पाच लाख वारकरी पुण्यात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षिततेसाठी यंदा पुणे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक अभिनव पाऊल उचलले. गर्दीचे व्यवस्थापन आणि संख्येचे विश्लेषण करण्यासाठी यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर करण्यात आला. पुणे पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे आणि विशेष सॉफ्टवेअर बसवले होते. या प्रणालीद्वारे दोन्ही पालख्या शहरात दाखल होण्यापासून ते प्रस्थान होईपर्यंतची प्रत्येक हालचाल टिपली गेली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “वारीचा प्रचंड जनसागर लक्षात घेता, पारंपरिक उपाय पुरेसे ठरणार नव्हते. त्यामुळे एआयचा वापर करून आम्ही वेळेआधी नियोजन, प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि नंतर विश्लेषण या तीन पातळ्यांवर यशस्वी कामगिरी केली.” एआय प्रणालीद्वारे जमलेल्या आकडेवारीमुळे वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा व्यवस्थापन आणि पोलिस बंदोबस्त अधिक परिणामकारकरित्या राबवता आला. विशेषतः पालखी मार्गावरील प्रमुख रस्ते, चौक आणि वाहनतळ याठिकाणी गर्दीचा अंदाज घेऊन नियोजन करण्यात आले. वारीच्या काळात कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही, ही यशस्वी कार्यवाही पुणे पोलिसांच्या कणखर नियोजनाची आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची साक्ष आहे. वारकऱ्यांनीही शिस्तीने सहभागी होत वारीच्या पारंपरिक भक्तिसंस्कृतीला आधुनिक व्यवस्थापनाची जोड दिली. पुण्यातील ही “डिजिटल वारी” भाविकांच्या श्रद्धेप्रमाणेच स्मार्ट यंत्रणेमुळेही संस्मरणीय ठरली.






