कल्याण : कल्याण, उल्हासनगर मधीस सराफांच्या दुकानात ग्राहक म्हणून जाऊन दुकान मालकाची नजर चुकवून सोने, चांदीचा ऐवज चोरुन नेणाऱ्या उल्हासनगर मधील दोन महिलांना येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. निशा अशोक पुनवानी (३५), रेश्मा अशोक पुनवानी (३६) असे अटक करण्यात आलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत. या महिलांकडून चोरीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत ५६ हजार रुपये आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात कल्याण मधील शिवाजी चौकातील विमल शंकलेशा यांच्या मालकीच्या जवाहिऱ्याच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी मालक, कामगाराची नजर चुकवून सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या.
दुकानात ग्राहकांची गर्दी असल्याने आणि कामगार दुकानाच्या आतील भागात आणि मंचकासमोर येजा करुन विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या ग्राहकांना दाखविण्यात व्यस्त होता. या संधीचा गैरफायदा या चोरट्या महिलांनी घेतला. त्यांनी हातचलाखी करुन शंकलेशा सराफाच्या दुकानात ५६ हजाराच्या सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. विमल शंकलेशा यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
चोरट्या महिला दुकानातून निघून गेल्यावर कामगाराला ग्राहक महिलेला दाखविलेल्या सोन्याच्या अंगठ्या आढळून आल्या नाहीत. दुकानात, मंचकाखाली शोध घेतला. त्या आढळून आल्या नाहीत. दुकानातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. त्यावेळी दोन महिला दुकानात हातचलाखी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हे चित्रण ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या महिलांनीच चोरीचा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करुन पोलिसांनी तपास सुरू केला. या महिलांची ओळख पटवल्यावर त्या उल्हासनगर मधील असल्याचे निष्पन्न झाले. उल्हासनगर मधील कुर्ला कॅम्प येथे निशा, रेश्मा महिला राहत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्या भागात सापळा लावला. त्यांना अटक केली. शंकलेशा, उल्हासनगर मधील एका सराफाच्या दुकानात अशाप्रकारची चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. या महिलांचे ब्युटी पार्लर आहे. या पार्लरचा खर्च भागविण्यासाठी त्या अशाप्रकारे चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या महिलांनी अन्य ठिकाणी असे प्रकार केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.