पुणे : पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस शिपायांवर चार जणांच्या टोळीने अचानक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आली आहे. ही घटना चर्च चौक खडकी येथे ३१ जुलैच्या रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे हे दोघे मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान, एका वाहनचालकाने अतिशय वेगात व वेडीवाकडी गाडी चालवत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला थांबवून विचारणा केली. मात्र, या क्षुल्लक कारणावरून वाहनात असलेल्या चार जणांनी संतप्त होऊन पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले व बेदम मारहाण केली. घटनेनंतर जखमी पोलिसांनी तातडीने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गोपाल देवसिंग कोतवाल यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.







