मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची दखल आता विधानसभेतही घेण्यात आली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि गुटखा माफियांविरोधात सुरू केलेल्या कठोर मोहिमेमुळे मुंढे यांचे कामकाज राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी त्यांची किमान तीन वर्षे बदली करू नये, अशी जोरदार मागणी सभागृहात केली. या मागणीची दखल घेत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीला शासनाची मान्यता मिळाल्याचे चित्र दिसून आले.
चर्चेदरम्यान अनेक आमदारांनी मुंढे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. यापूर्वी अनेक अधिकारी या विभागात कार्यरत होते, मात्र मुंढे यांनी केलेल्या धाडसी आणि परिणामकारक कारवाया अभूतपूर्व असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. दरम्यान, भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधातील मोहिमेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना सामाजिक माध्यमांद्वारे धमक्या दिल्या जात असल्याचा मुद्दाही सभागृहात उपस्थित करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंढे यांना कडक सुरक्षा देण्याची तसेच त्यांची बदली न करण्याची मागणी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री नरहरी झिरवाळ आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी समन्वयाने काम करून राज्यातील अन्नभेसळ पूर्णपणे नष्ट करावी, असे आवाहन केले. विरोधी पक्षाचे नेते नाना पटोले यांनी विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. आमदार अर्जुन खोतकर यांनी मुंढे यांच्या कारवाईमुळे अनेक भागांतील गुटखा विक्रीवर आळा बसल्याचे सांगत, यापूर्वीच्या अधिकाऱ्यांना अशी प्रभावी कामगिरी का करता आली नाही याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा भेसळ सुरू होत असल्याची बाब आमदार सुनील शेळके यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुनरावृत्ती करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अधिक कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. वारंवार गुन्हा करणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे राज्यातील अन्नसुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.







