ठाणे : श्रावण सुरू होण्याआधी गटारीच्या निमित्ताने ‘ओल्या पार्टी’त शेवटच्या ‘एकच प्याला’ म्हणत नशेत तर्र होऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांची झिंग ठाणे वाहतूक शाखेने कारवाई करून उतरवली. गटारी शनिवारपासून सुरू झाल्यानंतर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ठाण्यात ४७ मद्यपी आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या एकूण ४४३ वाहनचालकांवर ठाणे वाहतूक शाखेने कारवाई केली. यात एकूण चार लाख ५९ हजाराचा दंडही वसूल करण्यात आला.
ठाण्यात गटारीच्या पार्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल्स, ढाब्यांवर तळीरामांची झुंबड उडाली होती. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालवताना अपघात घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या व मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. यात गुन्हे विभाग, स्थानिक पोलिस, गस्ती पथक आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने एकूण एक हजार १०९ वाहने तपासली. त्यापैकी वाहतूक नियम न पाळणाऱ्या ४४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४७ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. तर विना हेल्मेट फिरणाऱ्या ११० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.