मुंबई : विक्रोळीतील जिम ट्रेनरला स्वस्तात सोन्यातून पैसे कमवण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट सहा लाखांत देतो, असे सांगून त्याला फसवण्यात आले. ही फसवणूक करताना, पोलिसांचा छापा पडल्याचे भासवण्यात आले होते. तोतयांच्या सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच ट्रेनरने पोलिसांत धाव घेतली. व्यायामशाळेत प्रशिक्षण देणाऱ्या विक्रोळी येथील समीर (बदललेले नाव) याच्या मित्रांनी त्याला अनूप आणि हेमंत अग्रवाल नावाच्या व्यक्तींबाबत सांगितले. हे दोघे बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. १०० ग्रॅमचे सोन्याचे बिस्किट बाजारात सात लाखांपेक्षा अधिक दरात मिळते, तेच बिस्कीट हेमंत सहा लाखांत देत असल्याचे सांगितले. या सोन्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत की नाही, याची खात्री करून द्यावी लागत असल्याची माहिती समीरच्या मित्रांनी दिली. सहा लाखांत बिस्कीट घेऊन ते बाजारात सात लाखांना विकल्यास एक लाख रुपये फायदा होईल, असा विचार करून समीर याने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. पैशाची जमवाजमव करून त्याचा व्हिडीओ तयार करून समीरने हेमंत याला पाठवला. पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर हेमंत याने सोन्याचे बिस्कीट देण्याचे मान्य केले.
पैसे घेऊन हेमंतने समीरला आधी विक्रोळी पूर्वेला नंतर पश्चिमेला आणि समीर, त्याचे मित्र तासभर थांबल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी यायला सांगितले. या ठिकाणी समीर आणि त्याचे मित्र वाट पाहत असताना अनूप नाव सांगणारा हेमंतचा असिस्टंट त्याठिकाणी आला. त्याने पैशाची बॅग समीरकडून घेतली आणि एका लालसर पिशवीतील सोन्याचे बिस्कीट देत असतानाच एक पोलिस अधिकारी त्या ठिकाणी आला. त्याने अनूपला लाठीने मारहाण करीत कारमध्ये बसविले आणि पोलिस ठाण्यात नेतो, असे म्हणत घेऊन गेला. या प्रसंगानंतर समीरने हेमंतला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळले. बिस्कीट तर मिळाले नाही आणि पैसेही गेले. त्यावेळी आपल्याला फसविण्यासाठीचा हा सर्व कट असल्याचे लक्षात आल्यावर समीर याने पार्कसाइट पोलिस ठाण्यात तक्रार केली.