मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी बेस्ट उपक्रमाने बोरिवली स्थानक ते कान्हेरी गुंफादरम्यान धावणारी वातानुकूलित बेस्ट बस बंद पूर्णत: केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्याा उपसंचलकांनी (दक्षिण) यासंदर्भात बेस्ट उपक्रमाला पत्र पाठवले होते. दरम्यान, आता कान्हेरी गुंफा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पायपीट करीत जावे लागणार आहे.
मुंबईमधील बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान केवळ मुंबईकरांचेच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण स्थान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा पाहण्यासाठी अभ्यासक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमाने बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) आणि कान्हेरी गुंफा दरम्यान वातानुकूलित बसमार्ग क्रमांक ए-१८८ सुरू केली होती. त्यामुळे पर्यटकांना राष्ट्रीय उद्यान आणि कान्हेरी गुंफा येथे जाणे-येणे सोपे झाले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालकांनी (दक्षिण) पाठवलेल्या पत्राची दखल घेत बेस्ट उपक्रमाने बसमार्ग क्रमांक ए-१८८ चे प्रवर्तन १६ जानेवारी २०१६ पासून बंद केले. पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या बसमार्गाचे प्रवर्तन बंद करण्यात आले आहे.







