पुणे : राज्यातील आगरी-कोळी समाजातील बांधवांची कुळदैवता असलेल्या लोणावळा येथील एकविरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे. या यात्रे निमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. या टोलमाफीसाठी पत्र आवश्यक असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिली.
लोणावळा येथे आगरी-कोळी समाजासह विविध जाती-धर्माचे लोक एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यावर्षी देवीची यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी संपन्न होणार आहे. यात्रे निमित्ताने ठाणे, मुंबई- मुंबई उपनगर, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज वाहनाने मुंबई-पुणे महामार्गाने लोणावळा येथे एकविरा मंदिर परिसरात जात असतो. टोलमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा टोलनाक्यावर वादाचे प्रसंग उद्भवतात. तसेच टोल वसूली करताना विलंब देखील होतो. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर टोल माफी व्हावी अशी मागणी केली जात होती. महामार्ग आणि टोल प्रशासनाने टोल माफीची विनंती ऐकली असून तीन दिवस ही टोल माफी सुरू राहणार असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली. या टोल माफीसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भाविकांना टोल माफ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.






