नवी मुंबई : तुर्भे येथील के. के. आर. रोड टेकडी भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या महिला काही महिन्यांपासून या ठिकाणी मजुरी व घरकाम करून बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
तीन बांगलादेशी महिला के. के. आर. रोड टेकडी परिसरात बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने तुर्भे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहुल गायकवाड यांनी या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने शनिवारी सकाळी या परिसरात एका घरावर छापा टाकत रेखा अनिस शेख (वय ४०), प्रिया अब्दुल शेख (वय ४०) व शिखा अब्दुल शेख (वय ६०) या तीन महिलांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी बांगलादेशातील गरिबीला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या तिघींना अटक करण्यात आली आहे.