नाशिक : आठ दिवसांवर आलेल्या मकरसंक्रांतीमुळे शहरात पतंगबाजीला सुरुवात झाल्याने पोलिसांनीही नायलॉनसह इतर घातक मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गत आठ दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दहा संशयितांना ताब्यात घेत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नायलॉन मांजाला ‘प्रतिबंध’ करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात नायलॉन मांजासह इतर घातक मांजाविरोधात आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार मांजानिर्मिती, साठा, विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही तडीपार करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, १३ पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखांची पथके मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अठरा ते पंचवीस वयोगटातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १८८ सह पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री यंदा बऱ्यापैकी नियंत्रित झाल्याचे दिसते. मात्र, संक्रांतीपर्यंत या स्वरूपाच्या कारवाईत वाढ करण्यासंदर्भात पोलिसांनी पथके कार्यान्वित केली आहेत.
– नायलॉनसह घातक मांजानिर्मिती, विक्री, साठा व वापर करण्यावर प्रतिबंध
– महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) (अ) अन्वये मनाई
– कोणत्याही हालचाली, कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीला भय, धोका किंवा दुखापत झाल्यास संबंधितांवर तडीपारी
– परिमंडळ एक आणि दोनसह गुन्हे विभागाच्या पोलिस उपायुक्तांच्या पथकांची कारवाई