मुंबई : वर्ल्डकप २०२३ मध्ये शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट मैदानावर आला. त्याने सलामीवीर शुभमन गिलसह फक्त संघाचा डाव सावरला नाही तर वैयक्तीक एक मोठा विक्रम देखील केला. श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने ११व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर एक धाव घेतली. ही त्याच्या डावातील ३४वी धाव होती. यासह वनडेत या कॅलेंडर वर्षात त्याच्या १ हजार धावा पूर्ण झाल्या. कॅलेंडर वर्षात १ हजार धावा पूर्ण करण्याची ही त्याची आठवी वेळ आहे. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. याआधी हा विक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने सात वेळा अशी कामगिरी केली होती.
सचिन तेंडुलकरने वनडे एका कॅलेंडर १ हजार धावा करण्याची कामगिरी सर्व प्रथम १९९४ साली केली होती. त्यानंतर १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३, २००७ साली सचिनने १ हजार धावा केल्या होत्या. विराट कोहलीने २०११ साली सर्व प्रथम एका कॅलेंडर वर्षात १ हजार धावा करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर २०१४ पर्यंत म्हणजे सलग चार वर्ष त्याने प्रत्येक वर्षी १ हजार धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१७ ते २०१९ अशी ३ वर्ष आणि आता २०२३ साली पुन्हा एकदा त्याने १ हजार धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर विरटाने ५० चेंडूत वनडे क्रिकेटमधील आणखी एक अर्धशतक पूर्ण केले.
वनडेत कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा १ हजार धावा
विराट कोहली- ८ वेळा (२०११ ते २०१४, २०१७ ते २०१९ आणि २०२३)
सचिन तेंडुलकर- ७ वेळा (१९९४, १९९६ ते ९८, २०००, २००३, २००७)
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर- ४४ डावात २१ वेळा
विराट कोहली- ३३ डावात १३ वेळा
कुमार संगकारा- ३५ डावात १२ वेळा
शाकिब अल हसन- ३५ डावात १२ वेळा
रोहित शर्मा- २४ डावात १२ वेळा