मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू आहेत. ही कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करून जनतेच्या सेवेत रूजू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. मंत्रालयीन दालनात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सोयीसुविधा विकास शाखेच्या बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेताना बोलत होते. बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसचिव विजय लहाने, जनआरोग्य योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंद्रे, पायाभूत सोयीसुविधा विकास शाखेचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी १५ व्या वित्त आयोगाचा मंजूर निधी पूर्णपणे खर्च करण्याच्या सूचना करीत मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मंजूर कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्यानुसार (प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन प्लॅन) कामे पूर्ण करावीत. मंजूर कामांवरील पूर्ण खर्च करण्यात यावा. नवीन निर्माण करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ‘स्टाफ पॅटर्न‘ तयार करावा. मनुष्यबळ पुरवून रुग्णालय जनतेच्या सेवेत सुरू करावे. महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेची कार्ड ई केवायसी पूर्ण करून तयार करावे. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण करावे. योजनेच्या सूचीमध्ये आणखी रुग्णालये घ्यावयाची आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या, सध्या सूचीत असलेली रुग्णालयांची संख्या, रुग्णालयांमधील भौगोलिक अंतर आदी बाबी लक्षात घेवून सूचीमधील रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी. आरोग्य विमा कवच दीड लाख रूपयांवरून ५ लाख रूपये करण्यात आले आहे. याबाबत तातडीने आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रोपोजल) करावी. त्यासाठी वेळापत्रक ठरवून घ्यावे. ही कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी दिले.