पुणे : मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जगात सर्वात उंच असल्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. पुतळ्याच काम अंतिम टप्प्यात आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभारण्यात येत आहे. स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण ला ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली. तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशे ध्वजांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. यावेळी मर्दानी खेळांनी लक्ष वेधले.
चिखली येथील संतपीठाच्या माध्यमातून कीर्तन सादर करण्यात आले. बाल शिवभक्तांनी शिवगर्जनाने लक्ष वेधले. प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी शिव गीत गायले. शिव गीतांवर शिवभक्तांनी एकच ताल धरला होता. मानवंदना बघण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा ब्राँझ धातू पासून उभारण्यात येत आहे. पुतळ्याची उंची तब्बल शंभर फूट आहे. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेकडून पुतळा उभारण्यासाठी तब्बल ४८ कोटी खर्च केले जात आहेत. याच परिसरात मोशी येथे शंभू सृष्टी साकारली जात आहे. यावेळी स्मारकाचा उद्देश आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आला. प्रा. इंद्रजीत भोसले यांनी स्मारकाची उद्दिष्टे यावेळी जाहीर केली ते म्हणाले की, हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी-चिंचवडची स्थापना सन १८६० संस्था नोंदणी अधिनियमाच्या कलम २० अन्वये करण्यात आलेली आहे. स्मारकाचा उद्देश तरुण पिढीमध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार भावी पिढ्यापर्यंत आणि जगभरात प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार स्वातंत्र, पराक्रम धर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी समर्पित होते त्यांनी आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या विचारांना समर्पित असे काम ट्रस्ट येणाऱ्या कालावधीत करेल.







