वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा वनडे संघात समावेश करण्यात आला असून, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे. वनडे संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार असून केएल राहुल उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहेत. युवा खेळाडू औकिब नबी आणि नमन धीर यांना प्रथमच वनडे संघात संधी देण्यात आली आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वनडे संघात स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे, ईराणी चषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या रेस्ट ऑफ इंडिया संघाचे नेतृत्व पंतकडे सोपवण्यात आले आहे. वनडे संघात शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल आणि नमन धीर यांचा समावेश आहे.
टी-२० संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार असून तिलक वर्मा उपकर्णधार असतील. संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयंक यादव यांना स्थान देण्यात आले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला वनडे तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता, दुसरा सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर, तर तिसरा आणि अंतिम वनडे ३ ऑक्टोबरला मुल्लांपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधत निवड समितीने आगामी मालिकेसाठी मजबूत संघ निवडल्याचे मानले जात आहे.





