नवी मुंबई : मासेमारीचा नवा हंगाम १५ ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर आता समुद्रातून मोठ्या प्रमाणात मासळीची आवक वाढू लागली आहे. गेल्या महिनाभर हवामान आणि इतर कारणांमुळे बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने दर गगनाला भिडले होते. मात्र, सध्या एकाच वेळी मोठ्या संख्येने मासेमारी बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्याने घाऊक बाजारात मासळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात ताजी मासळी मिळू लागली असली, तरी दुसरीकडे मच्छीमारांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक फटका बसत आहे. उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे आणि आवरे परिसरात खोल समुद्रातील मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागात ७०० हून अधिक मासेमारी बोटी कार्यरत असून, पूर्वी मासळी विक्रीसाठी मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे जावे लागत होते. मात्र, आता राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ६०० मीटर लांबीच्या ‘करंजा-द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदरा’मुळे स्थानिक पातळीवरच मासळीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने या बंदरात दाखल होत असून, दररोज सायंकाळी गजबजलेला मासळी बाजार भरत आहे.
या बाजारात कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोंबील यांच्यासह ३० ते ४० प्रकारची मासळी विक्रीसाठी उपलब्ध आहे. मासळीचे दर ₹१०० ते ₹१,२०० प्रति किलो दरम्यान असून, ग्राहकांना विविध पर्याय मिळत आहेत. विशेष म्हणजे, बोंबीलच्या दरात मोठी घसरण झाली असून, जून-जुलैमध्ये ₹१५० ते ₹२०० प्रति किलो दराने विकला जाणारा बोंबील आता अवघ्या ₹५० प्रति किलो दराने उपलब्ध आहे. करंजा बाजारातील सध्याचे दर पाहता कोलंबी ₹२०० ते ₹२५०, पापलेट ₹६०० ते ₹१,०००, सुरमई ₹४०० ते ₹८००, कलेट ₹६०० ते ₹१,०००, कुपा ₹१८० ते ₹२००, तेल बांगडा ₹१८० ते ₹२१०, रिबन फिश ₹१७० ते ₹२००, तर हलवा ₹२०० ते ₹४०० प्रति किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य खवय्यांना दिलासा मिळाला असला, तरी मोठ्या प्रमाणात मासळीची आवक आणि घाऊक बाजारातील घसरलेले दर यामुळे मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे मत मच्छीमारांनी व्यक्त केले आहे.






