मुंबई : लोकल प्रवासादरम्यान अपघात, अचानक प्रकृती बिघडणे किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावरील ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या स्थानकांवर वैद्यकीय कक्ष कार्यान्वित केले जाणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात १२ आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यरत आहेत. यापैकी कल्याण, भायखळा आणि वाशी येथील कक्षांची जबाबदारी रेल्वेच्या वैद्यकीय विभागाकडे असून त्यांचे व्यवस्थापन ‘अॅनी फाउंडेशन, ठाणे’ या संस्थेकडे आहे. तर कर्जत, कुर्ला, टिटवाळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, भांडुप, कांजूरमार्ग आणि डोंबिवली येथील कक्ष वाणिज्य विभागामार्फत चालविले जात आहेत. नव्या योजनेमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये वैद्यकीय सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार असून लाखो प्रवाशांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे.
या नव्या वैद्यकीय कक्षांमध्ये अपघातग्रस्त किंवा आजारी प्रवाशांना प्राथमिक उपचार तातडीने उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर गरजेनुसार संबंधित रुग्णाला जवळच्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. चेंबूर आणि मानखुर्द येथील वैद्यकीय कक्षांसाठी औषध परवान्याची प्रक्रिया सुरू असून, खोपोली स्थानकावरील कक्षासाठी पावसाळ्यानंतर बांधकामाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तीन स्थानकांवरही सेवा सुरू होईल. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने २००९ मध्ये रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान ३२ स्थानकांपैकी २२ स्थानकांवर ही सुविधा आधीच उपलब्ध आहे. आता मध्य रेल्वेही ४३ नव्या वैद्यकीय कक्षांद्वारे ही सेवा अधिक व्यापक करण्याच्या तयारीत आहे. मुंबई लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीमुळे चक्कर येणे, पडणे, दुखापत होणे किंवा इतर वैद्यकीय अडचणी उद्भवण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा वेळी स्थानकावरच तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या स्थानकांवरील प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.






