वसई : राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना टपालाने राख्या पाठवण्यासाठी अनेकांनी आज टपाल केंद्रात गर्दी केली आहे. पण, वसईतील अनेक टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे राख्या पाठविणाऱ्या बहिणींना ताटकळत उभे राहावे लागले. तर अन्य नागरिकांची टपाली कामे खोळंबली.
येत्या ९ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. राखीपौर्णीमेसाठी अवघे दोन – तीन दिवस बाकी असताना घरापासून दूर किंवा परगावी राहणाऱ्या भावांना राख्या पाठवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे. अशातच दरवर्षी राख्या पाठवण्यासाठी बहुसंख्य लोक टपाल केंद्रात गर्दी करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून वसईतील बहुतांश टपाल केंद्रातील सर्व्हर डाऊन असल्यामुळे राखी पाठवण्यासाठी तासनतास लोकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच अनेकांना एका टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे दुसऱ्या टपाल केंद्रात धावपळ करावी लागतेय. बुधवारी सकाळपासूनच वसई पूर्वेतील तसेच वसई पश्चिमेतील पापडी टपाल केंद्रासह बहुतांश ठिकाणच्या टपाल केंद्रातील सर्व्हर डाऊन आहेत. त्यामुळे सकाळी साडेसात आठ वाजल्यापासूनच वसईच्या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी वसई पश्चिमेतील वसई रोड टपाल केंद्रात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.







