मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) आता खऱ्या अर्थाने ‘जंगलाचा राजा’ डरकाळी फोडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, राणीच्या बागेत आशियाई सिंह आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने थेट गुजरात सरकारशी संपर्क साधण्याची तयारी केली आहे. कोरियन पेंग्विननंतर आता गुजरातचे सिंह दाखल होणार असल्याने पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचा अंदाज आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे या लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना अधिकृत पत्र पाठवणार आहेत. या पत्राद्वारे राणीच्या बागेसाठी किमान एक किंवा दोन आशियाई सिंह देण्याची विनंती केली जाणार आहे. गुजरातमध्ये आशियाई सिंहांचे प्रमाण मोठे असल्याने आणि तेथील हवामानाशी जुळवून घेणारे प्राणी असल्याने ही मागणी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत हा अधिकृत प्रस्ताव गुजरात सरकारला सादर केला जाईल. राणीच्या बागेत सध्या पेंग्विन, वाघ, बिबट्या आणि हत्ती यांसारखे अनेक प्राणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोणताही मोठा नवीन प्राणी, विशेषतः सिंह दाखल झालेला नाही. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्राणिसंग्रहालयात अधिक विविधता आणण्यासाठी महापौरांनी हा पुढाकार घेतला आहे. या नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे बच्चेकंपनीसह पर्यटकांच्या उत्साहात भर पडणार आहे. राणीच्या बागेत सिंहांना ठेवण्यासाठी आवश्यक असलेली जागा, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि वैद्यकीय सुविधा पूर्णपणे सज्ज आहेत. सिंहांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्यासाठी विशेष तयारी करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.







