पुणे : यंदापासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा लागू करण्यात आली. त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्यात शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली. त्यानुसार पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे. तसेच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची अंमलबजावणी करून यंदापासून पाचवी, आठवी या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यशाळा पुण्यात झाली. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील मुख्याध्यापक या कार्यशाळेला उपस्थित होते. मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, की कार्यशाळेत सहभागी मुख्याध्यापकांकडून आलेल्या प्रतिसादानुसार शहरी भागातील पाचवी, आठवीच्या वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यात शहरी भागात पाच टक्के, तर ग्रामीण भागात तीन ते चार टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे निरीक्षण मुख्याध्यापकांनी नोंदवले. एखाद्या विषयात विद्यार्थ्याला कमी गुण असल्यास त्याला सवलतीचे गुण देण्याचा पर्याय असूनही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.