मुंबई : जागतिक पातळीवरचे उच्च शिक्षणातील अनेक बदल लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी श्री. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठ आणि देश -विदेशातील ३६ पेक्षा अधिक नामांकित शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांच्यासह देश-विदेशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, जागतिक पातळीवरील स्टार्टअप, नवीन संशोधन, इनोव्हेशन यांना अधिक महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना अधिक कुशल करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होत आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढविण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. या करारामुळे नवीन संशोधनाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच परदेशी विद्यापीठाकडून महाराष्ट्रातील विद्यापींठाना शैक्षणिक सहकार्य मिळेल असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. कुलगुरू प्रा. रवीद्र कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान –प्रदान विविध शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, कृत्रिम बुद्धीमत्ता, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधीचे दालन यानिमित्ताने खुले होणार आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टिकोनातूनही या करारांचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामंजस्य करार करण्यात आलेल्या संस्थांमध्ये ८ परदेशी विद्यापीठे, युरोपीयन कंसोर्सियामधील ७ विद्यापीठे, १० औद्योगिक संस्था, ५ शासकीय संस्था, ३ राज्ये विद्यापीठे, समीर-आयआयटी मुंबई, सेक्टर स्कील काँऊंसिल, स्टार्टअप, एनजीओ अशा विविध नामांकित संस्थांचा यामध्ये समावेश आहे. पर्ड्यू विद्यापीठ, सेंट लुईस विद्यापीठ, मॉरिशस कल्चरल सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बन, बोलग्ना, मलहाऊस डाकर, स्ट्रासबर्ग, गोएथे युनिव्हर्सिटी जर्मनी, ट्रायस युनिव्हर्सिटी फ्रांस, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, प्राइस वॉटरहाउस कुपर, रिटेलर्स असोसिएशन स्किल कौन्सिल ऑफ इंडिया, सासमीर, समीर, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ पॅकेजिंग, आयसीसीआर, फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बार्टी, सीआयडीएम, स्वामीनारायण एकेडमिक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, वृंदावन गुरुकुल, ओटीएआय, द कलर सोसायटी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि ठाणे, गो शुन्य यासारख्या विविध नामांकित संस्थांबरोबर करार करण्यात आले.