मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत तसेच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात तालुका पातळीवर होणारे नातेवाईकांचे हाल लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये महापालिकेच्या शववाहिन्या असतात तसेच मोठ्या प्रमाणात खाजगी शववाहिन्याही उपलब्ध असतात. महापालिका क्षेत्रात तसेच शहरी भागात पालिका रुग्णालये, शासकीय वा खाजगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालये ते घर वा स्मशानभूमीपर्यंत मृतदेह वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोफत तसेच पैसे भरून शववाहिन्या उपलब्ध होतात. मात्र याच्या उलट परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. प्रामुख्याने करोना काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असताना मृतदेह वाहून नेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. आजही ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह खाजगी जीप वा बैलगाडीमधून न्यावा लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मृतदेह वाहून नेण्यासाठी फारशी व्यवस्था नसल्यामुळे लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागाने याबाबत पुढाकार घेऊन व्यवस्था करावी, अशी मागणी वेळोवेळी विधिमंडळाच्या अधिवेशनातही करण्यात आली आहे.