पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे रेल्वे स्थानकाजवळ आगरकरनगर परिसरात धडक कारवाई करून सुमारे ६१ किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे १३ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मानश कुमार स्वाईन (वय ३८, रा. हरीहरुपर, जि. नयाघर, ओडिशा), लालमोहन फ्रान्सिस बिर (वय ३४, रा. अतंराबा, जि. गजपती, ओडिशा) आणि श्रीकांत अभिमन्यू बिरा (वय ३७, रा. मोहना जि. गजपती, ओडिशा) अशी आरोपींची नावे आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाजवळ आगरकरनगर परिसरात गांजा विक्रीसाठी तिघेजण आल्याची माहिती पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-दोनचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस अंमलदार चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, युवराज कांबळे, सय्यद साहिल शेख, आझीम शेख आदींनी सापळा रचून तिघा आरोपींना ताब्यात घेतले.





