ठाणे : एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठी ताकद आहे, त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चक्रव्यूह रचलेय. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच अडकवण्यसाठी ठाकरेंनी हा प्लॅन आखल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतण्याला तिकीट देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना एबी फॉर्म दिलाय, ते पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंनीही त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत जिल्हा अध्यक्षपद दिले. केदार दिघे यांनी लोकसभेला ठाकरेंसाठी शंभर टक्के काम केले. केदार दिघे यांना आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या विरोधात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत, सध्या ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारंसघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात शिंदेंचे मोठं वर्चस्व आहे. याच वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी ठाकरेंनी व्युहरचना आखली आहे. कोपरी पाचखाडी मतदारसंघात केदार दिघे यांचं तिकीट निश्चित मानले जात आहे. त्यांना एबी फॉर्मही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे असा सामना होईल, मिळालेल्या माहितीनुसार, केदार दिखेंनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात ठाकरेंकडे उमेदवारी मागितली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार दिघेना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवार दिली जाईल. तर ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार सुरु आहे.