मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले मुंबई पोलीस विभागातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांना निवडणुकीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. वाझे यांनी केलेल्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला आहे. न्यायालयाकडून वाझे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ज्यामुळे निवडणुकीच्या काळात ते बाहेर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण दुसरीकडे मात्र त्यांचा मुक्काम वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. परंतु, सध्या तरी वाझे हे तुरुंगाबाहेर येण्याबाबतची माहिती समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर २०२० मध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर सचिन वाझे यांचे मुंबई पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली होती. विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्या वर्षीच सचिन वाझे यांना जामीन दिला होता. पण इतर दोन गुन्ह्यांतही ते आरोपी असल्याने गेल्या वर्षीपासून त्यांचा तुरुंगवास लांबला होता. त्यामुळे वाझे यांनी मे महिन्यामध्ये जामीनासाठी पुन्हा अर्ज केला होता. परंतु, तेव्हाही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.
सचिन वाझे यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने २३ ऑगस्ट रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल मंगळवारी जारी करण्यात आला. त्यामुळे सचिन वाझे यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझे यांना अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. जामीनाच्या अटी-शर्थी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. ज्यामुळे त्यांना कायमस्वरुपी नाही मात्र थोडाफार का असेना परंतु, दिलासा मिळाला आहे.