मुंबई: डोंगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० लाख रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांसह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तलवार, चाकू व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. डोंगरी येथील चिंचबदर परिसरात एका व्यक्तीकडून पोलिसांनी अर्धाकिलो मेफेड्रॉन व ८० ग्रॅम चरस जप्त केले. त्यांची किंमत ३४ लाख रुपये आहे. याशिवाय आरोपीकडून एक गावठी कट्टा, एअर पिस्टल, चार जिवंत काडतुसे, १२ पॅकेटस् छर्रे, एक तलवार, एक चाकू, इलेक्ट्रॉनिक वनज काटा, २६ मोबाइल फोन, सॅमसंग कंपनीचे तीन टॅब, ॲपल कंपनीचा एक मॅकबुक, एच.पी. कंपनीचा लॅपटॉप व रोख रक्कम आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर केलेल्या आरोपीच्या चौकशीत एका परदेशी नागरिकाचे नाव उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी मीरा रोड परिसरात सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीत एकूण २०० ग्रॅम एमडी, कोकेन व चरस सापडले. याशिवाय त्याच्याकडे रोख साडेतीन लाख रुपये सापडले. दोन्ही आरोपींविरोधात यापूर्वी प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.