मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली असतानाच, राजकीय स्थिरता राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर एका मोठ्या बदलाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली; ती म्हणजे अजित पवारांच्या दालनाबाहेर लागलेली सुनेत्रा पवार यांच्या नावाची ‘पाटी’. मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्याला विशेष महत्त्व आहे, कारण याच ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दालने आहेत. याच मजल्यावर असलेल्या ६०२ क्रमांकाच्या दालनावर गेल्या अनेक काळापासून ‘अजित पवार’ यांच्या नावाची पाटी झळकत होती. आज मात्र या पाटीची जागा सुनेत्रा पवार यांच्या नावाने घेतली आहे. ही केवळ एक नावाची पाटी नसून राज्याच्या सत्तेतील एका नव्या पर्वाची ती सुरुवात मानली जात आहे.
सुनेत्रा पवारांवर जबाबदाऱ्यांचा वर्षाव :
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदारीतही सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या खालील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत :
- महत्त्वाची खाती : राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती त्यांच्याकडे देण्यात आली आहेत.
- पालकमंत्री पद : अजित पवारांकडे असलेल्या पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पदही आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत.







