मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांवर आता तातडीने कारवाई केली जाणार आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे दारु पिऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असेल, तर ते केवळ शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी केवळ अपघाताला निमंत्रण देत नाही, तर एसटीच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, अशा प्रकारांना वेळीच आळा न घालणारे अकार्यक्षम अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट करत मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीचे सुरक्षा व दक्षता खाते आणि संबंधित अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच अशा बेशिस्त वर्तनाला खतपाणी मिळते. त्यामुळे संबंधित सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.







