शिर्डी : साईबाबांचे भक्त देश-विदेशात पसरलेले आहेत. श्रद्धा आणि भक्तिभावानं ते साईचरणी विविध प्रकारचं दान अर्पण करीत असतात. कुणी मुठभर धान्य अर्पण करतो, तर कुणी मौल्यवान दागिने, हिरे-जडजवाहिरात अर्पण करतो. सोमवारी (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर साईचरणी वाहनांच्या स्वरूपातील आतापर्यंतचं सर्वात मोठं दान प्राप्त झालं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी साईबाबा संस्थानला १० इलेक्ट्रिक वाहनं दान स्वरूपात प्राप्त झाली आहेत. ठाणे येथील साई पॉईंट ऑटोमोबाईल्स प्रा. लि. चे मालक व साईभक्त दिलीप पाटील यांनी साईबाबा संस्थानला 9 इलेक्ट्रिक होंडा अॅक्टिव्हा दुचाकी वाहनं दान स्वरुपात अर्पण केली आहेत. पर्यावरणपूरक व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही वाहनं साई संस्थानच्या दैनंदिन कामकाजासाठी, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी तसेच, संस्थानच्या विविध उपक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या सर्व ९ वाहनांची विधिवत पूजा साईभक्त दिलीप पाटील तसेच, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर अहमदाबाद येथील साईभक्त अनुज गर्ग यांनी साईचरणी आपली श्रद्धा व्यक्त करत एक इलेक्ट्रिक बग्गी (चारचाकी) वाहन साईबाबा संस्थानला दान स्वरूपात अर्पण केली आहे. हे वाहन विशेषतः वृद्ध, अपंग व गरजू भाविकांच्या सेवेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.







