ठाणे : उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अंजूरगाव खाडी, कालवारगाव, छोटी देसाई मोठी देसाई खाडी, अलिमघर, दिवा खाडी, माणेरेगाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रावर छापे टाकले. या मोहिमेतील कारवाईमध्ये १२ गुन्हे नोंदविले असून यामध्ये एकूण २१ लाख ८८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये ५५ हजार २०० लिटर रसायन, ३५ लिटर गावठी दारू, दोन डिझेल इंजिन व इतर हातभट्टी साहित्याचा समावेश आहे. नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला, तर दोन डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, ठाणे व डोंबिवली विभागातील निरिक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली आहे, असे कोकण उपायुक्त श्री.पवार यांनी कळविले आहे.