पुणे : ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला अश्फाक मकानदारने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या आवारात तीन लाख रुपये दिल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या सांगण्यावरून त्याने पैसे स्वीकारले असून, याबाबतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. मुलाला वाचविण्यासाठी विशाल आणि त्याची पत्नी शिवानी यांनी ससूनच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला. डॉ. तावरेने डॉ. हाळनोर याला अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यास सांगितले. मुलाच्या रक्तात मद्यांश मिळू नये, यासाठी शिवानीने रक्त नमुन्यासाठी स्वत:चे रक्त दिल्याचे तपासात उघडकीस आले.
मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल दाम्पत्याने ससूनमधील डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना पैसे दिल्याचे तपासात उघडकीस आले. शिपाई घटकांबळे याच्यामार्फत पैसे पोहचविण्यात आले होते. घटकांबळेकडून ५० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. डॉ. हाळनोरकडून अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले होते. डॉ. तावरे याच्या सांगण्यावरून आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले. मुलाला १९ मे रोजी येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या आवारात हजर करण्यात आले. बाल न्याय मंडळाच्या आवारात घटकांबळेने अश्फाक मकानदार याच्याकडून तीन लाख रुपये घेतले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण जप्त केले आहे. मकानदार दुचाकीवरून तेथे आला होता. दुचाकीच्या डिक्कीत त्याने रक्कम ठेवली होती.