मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील व्हीव्हीआयपी दर्शन रॅकेटप्रकरणी दादर पोलिसांनी जितेश चांदवेकर नावाच्या ३९ वर्षीय फूल विक्रेत्याला अटक केली आहे. चांदवेकर हा सिद्धिविनायक मंदिरातील व्हीव्हीआयपी दर्शनासाठी भक्तांकडून मोठी रक्कम घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. जितेश चांदवेकर हा वरळीत वास्तव्यास आहे. भक्तांच्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघडकीस झाला. त्यानंतर मंदिर ट्रस्टने दादर पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चांदवेकरला अटक केली. तसेच पोलिसांनी आणखी तीन संशयितांची ओळख पटवली असून मंगेश चव्हाण, पृथ्वीपाल राजपूत आणि रतिभान यादव अशी त्यांची नावे आहेत. ते सर्व प्रभादेवीचे रहिवासी आहेत.
व्हीव्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून दोन ते तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. त्या बदल्यात दर्शनासाठी मंदिरात जलद प्रवेश देण्यात येत असे. कथित व्हीव्हीआयपी दर्शनासाठी काही भक्तांकडून ऑनलाईन रक्कम पोलिसांनी चांदवेकर यांच्या बँक यूपीआई खात्याचाही तपास केला. तसेच भक्तांशी केलेले अनेक मोठे व्यवहार शोधून काढले. सध्या पोलिस चांदवेकरच्या पेटीएम खात्याद्वारे पेमेंट करणाऱ्या सर्व भक्तांची पडताळणी करत आहेत. आरोपी चांदवेकर गेल्या २५ वर्षांपासून मंदिराबाहेर दुकान चालवत आहे. दादर पोलिसांकडून चौकशीसाठी इतर तीन आरोपींना नोटीस पाठवली आहे.