पालघर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकांच्या घोषणेबरोबरच राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानंतर सर्व तपास यंत्रणा आणि पोलीस राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त करून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा पाली मार्गावरून विक्रमगडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर पोलिसांना संशय आला. यानंतर कार थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशय वाढल्याने कार वाडा पोलिस ठाण्यात आणून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कारमधून सुमारे ३ कोटी ७० लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.





