मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेतर्फे क्रांतीदिनानिमित्त दिल्लीत विशेष रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ८ आणि ९ ऑगस्ट रोजी दिल्लीतील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या दोन दिवसीय उपक्रमात महाराष्ट्रातील सुमारे १,२०० पैलवान सहभागी होणार आहेत. हा उपक्रम केवळ रक्तदानाचा नसून देशसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देणारा असल्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी सुमारे ५०० तर ९ ऑगस्ट अर्थात क्रांतीदिनाच्या दिवशी सुमारे ७०० रक्तदाते रक्तदान करणार आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांतील पैलवान या अभियानात सहभागी होणार असून त्यांचे नेतृत्व चंद्रहार पाटील करणार आहेत. या विशेष रक्तदान शिबिराचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, पक्षाचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिक नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उदय सामंत यांनी सांगितले की, या रक्तदान अभियानाचा उद्देश केवळ लष्करासाठी आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देणे एवढाच नसून देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि समाजात देशसेवेची भावना अधिक दृढ करणे हाही आहे. यापूर्वी शिवसेनेने जम्मूमध्येही अशाच स्वरूपाचे रक्तदान अभियान आयोजित केले होते. त्या वेळी महाराष्ट्रातील सुमारे १,२०० पैलवानांनी जम्मूतील एम्स आणि लष्करी रुग्णालयांमध्ये रक्तदान करून जवानांसाठी आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून दिला होता. त्या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा दिल्लीत आणखी मोठ्या प्रमाणावर हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष ताफा ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सांगली येथून दिल्लीकडे रवाना होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अभियानातून भारतीय लष्करासाठी आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देण्याबरोबरच देशभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि जवानांप्रती असलेली कृतज्ञता अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी नमूद केले. देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सैनिकांना समाजाचा पाठिंबा आणि सन्मान मिळावा, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






