सोलापूर : विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्याचे, झुरळे सापडल्याचे अनेक प्रकार समोर जात आहेत. ज्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. अशातच अक्कलकोट तालुक्यातील रेशनिंग दुकानामध्ये चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेत्या, खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिकचे तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप करत सॅम्पल देखील दाखवले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यात आंदेवाडी गावात रेशनच्या तांदुळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याचा गंभीर आरोप सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यासंबंधी महत्वाची पत्रकार परिषद घेत प्रणिती शिंदे यांनी प्लास्टिकचे तांदूळ वाटप करत असल्याचा आरोप करत सॅम्पल देखील दाखवले. रेशन दुकानात गरिबांना धान्य मिळत नाहीये, असं म्हणत यावेळी प्रणिती शिंदेंनी संताप व्यक्त केला. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावामध्ये अशा प्रकारचा तांदुळ विकल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तसेच यावेळी प्लॅस्टिकच्या तांदळाचे पॅकिंगही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. प्रणिती शिंदे यांच्या या दाव्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना संदर्भात विचारलं असता हे तांदूळ प्लास्टिकचे नसून फोर्टिफाईड असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. फोर्टफाईड तांदळात लोह, फॉलिक ऍसिड, बिटॅमिन बी १२ असे पोषक तत्व असतात. त्यामुळे हे तांदूळ प्लास्टिकसारखे भासते मात्र लोकांच्या शरीरास पोषक असल्याने हे तांदूळ दिले जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच या संदर्भात शासनाच्यावतीने जनजागृती देखील केली गेल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.