नवी मुंबई : खारघरमध्ये राहणाऱ्या एका पिता-पुत्राने फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुकाराम मुळे व गौरव मुळे अशी या पिता-पुत्रांची नावे असून या दोघांनी अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेले पोलिस निरीक्षक मुंबई पोलिस दलात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. २०१६ मध्ये त्यांना नवीन घर विकत घ्यायचे होते. त्यावेळी तुकाराम गंगाराम मुळे व त्यांचा मुलगा गौरव मुळे हे दोघेही पनवेलच्या करंजाडे सेक्टर-६ भागात संदीप कॉर्नर नावाने इमारतीचे बांधकाम करत असल्याची माहिती या पोलिस निरीक्षकला मिळाली होती. त्यावेळी त्यांनी तुकाराम मुळे यांच्या खारघर येथील आदित्य एन्टरप्रायजेसच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुळे पिता-पुत्रांनी साडेबारा टक्के योजनेतील प्लॉटवर इमारतीचे बांधकाम करत असल्याचे सांगितले होते.