वृत्तसंस्था : दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या थरारक घटनेत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव सध्या जगभर चर्चेत आहे. सहवैमानिकाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा विमान अपघात टळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्टन मच्छार यांना देशाचा खरा ‘नायक’ म्हटले. संकटाच्या क्षणी गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रवाशांचे प्राण वाचवण्याचा निर्धार प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी नमूद केले. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही भारतीय वैमानिकाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
या घटनेदरम्यान सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि विमानाचे नियंत्रण बिघडवण्याचा प्रयत्न केला. अवघ्या ३० सेकंदांत विमान तब्बल १४ हजार फूट खाली आले. गंभीर जखमी अवस्थेत कॉकपिटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कॅप्टन मच्छार यांनीही प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले. त्यानंतर प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी आत प्रवेश करून हल्लेखोर सहवैमानिकाला पकडले. याच वेळी विमानातील इतर दोन वैमानिकांनी नियंत्रण घेत विमानाचे सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. कॅप्टन स्मित मच्छार हे मूळचे मुंबईचे रहिवासी असून फ्लायदुबईमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी स्पाइसजेटमध्ये ११ वर्षांहून अधिक काळ वैमानिक म्हणून सेवा बजावली आहे. या हल्ल्यानंतर तबूक येथील रुग्णालयात त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. दरम्यान, सहवैमानिकाने हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याचा तपास सौदी अरेबियातील यंत्रणांकडून सुरू आहे. कंपनीनेही नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.






