नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक शनिवारी साप्ताहिक सुट्टी (Saturday Off) जाहीर केल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार, केंद्र सरकारने SBIसह सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा (5-Day Work Week) लागू करण्याची मंजुरी दिली असून, दुसरा आणि चौथा शनिवार ऐवजी आता प्रत्येक शनिवार सुट्टी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्हायरल दाव्याची सत्यता तपासल्यानंतर PIB Fact Checkने ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी प्रत्येक शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणारी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही, असे PIB Fact Checkने सांगितले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला संबंधित दस्तऐवज बनावट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांकडून सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याची आणि शनिवार-रविवार सुट्टी देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांनी अनेकदा आंदोलन आणि संपाची भूमिका घेतली होती. अलीकडेच आयबीए (IBA) आणि यूएफबीयू (UFBU) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रस्तावित तीन दिवसांच्या संपाचा निर्णय मागे घेण्यात आला होता. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बँक व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या बँकांमध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते, तर इतर शनिवारी नियमित कामकाज सुरू असते. दरम्यान, बँकांच्या प्रत्यक्ष कामकाजाबाबत कोणताही नवीन अधिकृत निर्णय झालेला नाही. ग्राहकांनी सोशल मीडियावरील अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची अधिकृत माहिती तपासावी. बँकांचे एटीएम, नेट बँकिंग, यूपीआय आणि मोबाईल बँकिंगसारख्या डिजिटल सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहतात. केंद्र सरकारशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती किंवा दस्तऐवज आढळल्यास नागरिकांनी PIB Fact Checkकडे त्याची सत्यता तपासण्यासाठी पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





