सांगली : विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी हाती आले. राज्यातील जवळपास २५ विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पहायला मिळाली. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली असून सर्वात तरुण उमेदवार म्हणून विधानसभेत मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत. रोहित पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक होती. शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांना पहिल्यांदाच उमेदवारीही मिळाली होती. अजित पवार गटाने त्यांच्याविरोधात संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण माजी खासदार संजय काका यांचा पराभव करत रोहित पाटील यांनी एक लाख २६ हजार मत मिळवत आघाडी घेतली. संजयकाका पाटील यांना ९९ हजार मतांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये विजेत्या ठरलेल्या आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांच्याकडे पाहिल जात आहे. रोहित पाटील यांचं वय २५ वर्ष असून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. रोहित पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या नावे एक लाख ६० हजार रुपयांचे दागिने आहेत. रोहित पाटील यांच्याकडे २८ लाख ४२ हजार रुपये चल मालमत्ता आणि ८६ लाख ८० हजार रुपयांची अचल मालमत्ता आहे.