मुंबई : करोना काळातील खिचडी घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संदीप राऊत यांना समन्स बजावले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे संदीप राऊत बंधू आहेत. येत्या आठवड्यात ईडी कार्यालयात उपस्थित राहून त्यांना बाजू मांडावी लागणार आहे. खिचडी घोटाळ्यातील काही रक्कम संदीप यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आली आहे, असा आरोप आहे. महापालिकेच्या खिचडी घोटाळ्यातील रकमांसंबंधी स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्ससह कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. करोनाच्या सुरुवातीच्या काळात फोर्स वन मल्टिसर्व्हिसेस (एफओएमएम) सुरक्षा फर्मने सुनील कदम ऊर्फ बाला यांच्या मदतीने कंत्राट मिळवले. या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि संजय माळी यांच्या स्नेहा केटरर्सने खिचडीची पाकिटे पुरवली.
मुंबई महापालिकेने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला ८.६४ कोटी रुपयांचे बिल दिले. सह्याद्री रिफ्रेशमेंटने महापालिकेच्या बिलातील काही रक्कम संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात वळती केली. यात संजय राऊत यांची मुलगी आणि त्यांचा भाऊ संदीप राऊत यांच्या बँक खात्यांचा समावेश आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. करोना काळात खिचडी वाटपासाठी महापालिका आणि कंत्राटदार यांच्यात करार झाला. करानानुसार प्रत्येकी २५० ग्रॅम खिचडीचे पाकिटे देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १२५ ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. खिचडी वाटपाचे कंत्राट मिळवण्यासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांशी संबंधीत असलेल्या कंत्राटदाराने आपले राजकीय वजन वापरून आपल्याच मर्जीतील संस्थेला कंत्राट दिले आणि घोटाळ्यातून मिळालेल्या बिलांच्या पैशांचे वाटप राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना केले आहे, असा आरोप आहे.