मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची गुरुवारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान सभागृहाने त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. उपसभापतीपदासाठी सुरुवातीला चार प्रस्ताव दाखल झाले होते. महाविकास आघाडीकडून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतर विरोधकांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर सचिन अहिर यांच्या नावाचे तीन स्वतंत्र प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आले. संजय खाडे, प्रवीण दरेकर आणि डॉ. मनीषा कायंदे यांनी त्यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला, तर अनुक्रमे विक्रम काळे, धैर्यशील कदम आणि रवींद्र फाटक यांनी त्यास अनुमोदन दिले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभागृहाने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी एकमताने निवड जाहीर केली. विधानपरिषदेतील उपसभापती हे अत्यंत महत्त्वाचे घटनात्मक पद मानले जाते. सभापती अनुपस्थित असताना सभागृहाचे कामकाज चालविणे, चर्चेचे संचालन करणे, नियमांचे पालन करून कामकाज सुरळीत पार पाडणे आणि सदस्यांना समान संधी उपलब्ध करून देणे, या उपसभापतींच्या प्रमुख जबाबदाऱ्या असतात. सचिन अहिर यांनी अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना महायुतीकडून उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. विधानपरिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे त्यांच्या निवडीची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती.
सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे तसेच विरोधी पक्षाचे आभार मानले. सभागृहाची उच्च लोकशाही परंपरा जपत विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सर्वानुमते निवड होणे ही लोकशाहीसाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये आपण आणि सचिन अहिर प्रथमच विधानसभेत एकत्र निवडून आलो होतो. त्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि स्वभावाचा जवळून परिचय झाला असून ते निर्भीड, सर्वसमावेशक आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या पदाची प्रतिष्ठा राखत उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. उपसभापतीपद स्वीकारल्यानंतर सचिन अहिर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात प्रेरणादायी ओळींनी केली आणि या पदासाठी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सभागृहाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मोठी जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेला “चार पैसे कमी कमवा, पण चांगले संबंध कमवा” हा कानमंत्र आजही आपल्या आयुष्यात मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचे आपण प्रामाणिकपणे पालन केले असून त्यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. आपल्या राजकीय प्रवासात घेतलेल्या निर्णयांबाबत मतभेद असू शकतात, मात्र उपसभापतीपदाची संधी ही स्वतःला अधिक जबाबदारीने सिद्ध करण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपसभापतीपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर पक्षभेद न करता सर्व सदस्यांना समान न्याय देण्याचा आणि सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे व लोकशाही मूल्यांचे पालन करत चालविण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







