मुंबई : उन्हाळी सुटीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर वाढणाऱ्या गर्दीचा ताण जाणवत आहे. अशा काळात आरटीओ कार्यालय आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सवाल्याने अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. सुटीच्या काळात एसटीसह रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे बुकिंग फुल होते. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खासगी बससेवेकडे वळावे लागते. नियमानुसार खासगी ट्रॅव्हल्सशी प्रासंगिक करारावर प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. नियमाप्रमाणे प्रवाशांची यादी आरटीओकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे; परंतु या नियमाकडे खासगी बसचालक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत खासगी बस चालकांनी तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.
मुंबईतील अनेक बस स्थानकांबाहेर खासगी बसचालकांचे बुकिंग काऊंटर आहे. या ठिकाणी रस्त्यावर बसचे बेकायदा पार्किंग केले जाते. मात्र, पोलिस आणि आरटीओ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. अशातच ट्रॅव्हल्स वाल्यांसाठी काम करणाऱ्या दलालांनी थेट एसटी आगारातूनच प्रवाशांची पळवापळवी सुरू केली आहे. त्यामुळे खासगी बसच्या मनमानी विरोधात कारवाईची मागणी होत आहे.
खासगी बस तिकीट दर (२१ एप्रिल)
मुंबई – औरंगाबाद : २,६३०
मुंबई – पुणे : १,९००
मुंबई – नाशिक : १,८००
मुंबई – रत्नागिरी : २,०००
एसटीचे दर रुपयांमध्ये
मुंबई – औरंगाबाद : ८४०
मुंबई – पुणे :५३५
मुंबई – नाशिक : ४००
मुंबई – रत्नागिरी : ५३०