मुंबई : मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत ७० हजार ७५ दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या आहेत. तर, दोन हजारहून अधिक दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्याकडे अद्यापही पाठच फिरवली असून त्याविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेने २८ नोव्हेंबर २०२३ पासून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली. दुकानांवर देवनागरी मराठीत ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिले. मुंबईत पाच ते सात लाखांहून अधिक दुकाने व आस्थापना आहेत. यापैकी अंदाजे दोन लाखांहून अधिक दुकाने व आस्थापनांनी दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावल्या नव्हत्या. याची अंमलबजावणी २८ नोव्हेंबरपासून सुरू झाली. यासाठी मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे २४ वॉर्डांत ४८ अधिकारी दुकानांची झाडाझडती घेण्यासाठी नेमले. दुकानांवर मराठीत पाटी नसल्यास प्रति कामगार दोन हजार रुपये दंड किंवा न्यायालयीन कारवाईची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
२८ नोव्हेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत ७२ हजार ७९४ दुकानांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ७० हजार ७५ दुकानांवर मराठी पाट्या बसवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर, २ हजार ७१९ दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या लावण्यात आल्या नसल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. १० जानेवारीला १ हजार ९४० दुकानांची पाहणी केली असता १ हजार ८९० दुकानांवर मराठी पाट्या असल्याचे निदर्शनास आले आहे.