मुंबई : पुण्याहून रस्ते मार्गाने मुंबईला येण्यासाठी साधारणपणे २ ते ३ तास लागतात. त्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती सर्वात जलद मार्ग मानला जातो. परंतु आता हे अंतर चक्क दीड तासांवर येणार आहे. लवकरच नव्या महामार्गाच्या कामाला सुरूवात होईल. केंद्रिय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. मंत्री गडकरी म्हणाले, मुंबईच्या अटल ब्रीजवरून खाली उतरल्यानंतर मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असा नवा महामार्ग लवकरच होणार आहे. पुणे, सातारा, सांगळी, बेळगाव असा हा मार्ग असेल. त्याचं ३०७ किलोमीटर अंतर महाराष्ट्रातून आणि ४९३ किलोमीटर अंतर कर्नाटकातून जाईल. या महामार्गामुळे मुंबईहून पुण्याला दीड तासात पोहोचता येईल, तिथून पुढे बंगळुरूला साडेचार ते पाच तासात पोहोचता येईल.
सातारा जिल्ह्यात साधारणपणे १०४ किलोमीटर, रायगड जिल्ह्यात ३५ किलोमीटर, पुणे जिल्ह्यात १२८ किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात ७४ किलोमीटरचा हा मार्ग असेल. एकूण ८०० किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरून ताशी १२० किलोमीटर वेगानं वाहनं चालवता येतील. या मार्गामुळे शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते. इथल्या दहिवडी-मायणी-विटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१६० या रस्त्याची सुधारणा आणि काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी मुंबई ते पुणे-बंगळुरू असा ६० हजार कोटींचा नवा द्रुतगती मार्ग तयार करणार आहोत, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली. त्यानुसार, या महामार्गाचं १० हजार कोटी रुपयांचं पहिलं काम महिनाभरात सुरू होणार आहे. तर, उर्वरित ५० हजार कोटींची कामं पुढच्या 6 महिन्यात पूर्ण करणार, असं नितीन गडकरींनी सांगितलं.