मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर बुधवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांतील वातावरणात अचानक बदल झाला. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, ठाणे तसेच नवी मुंबईच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यंदाचा नैऋत्य मान्सून अद्याप मुंबईत दाखल झालेला नसला तरी मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव कायम असल्याचे चित्र दिसून आले. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातही पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. भारतीय हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, मुंबई किनारपट्टीच्या उत्तरेकडे पावसाला पोषक मध्यम ते दाट ढगांचा पट्टा सक्रिय झाला असून पुढील काही तासांत उपनगरांमध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत वाऱ्याचा वेग वाढण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर पाऊस आणि सकाळी कडक ऊन असे बदलते हवामान अनुभवायला मिळत आहे. वादळी वाऱ्यांसह पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत प्रतीक्षा कायम असताना, विविध हवामान प्रणालींमुळे अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. गेल्या वर्षी मुंबईत मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. 26 मे 2025 रोजी मान्सूनच्या सर्वात लवकर आगमनाचा विक्रम नोंदवला गेला होता आणि कोलाबा व सांताक्रूझ वेधशाळांमध्ये विक्रमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. यंदा मात्र मान्सूनच्या आगमनाला काहीसा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत किंचित कमी राहू शकते. त्यामुळे कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.







