मुंबई : सेक्सटॉर्शन या सायबर फसवणुकीमुळे मानसिक तणावाखाली आलेल्या डोंबिवली येथील ३६ वर्षीय व्यक्तीने माटुंगा स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. आरोपींनी अश्लील व्हिडिओ कॉल करून या व्यक्तीचे चित्रीकरण केले होते. त्या बदल्यात आतापर्यंत दोन लाख रुपये या व्यक्तीने आरोपींना दिले होते, असे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. याप्रकरणी सेक्सटॉर्शनची मागणी करणाऱ्या तिघांविरोधात दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वेत नोकरीला असलेल्या या व्यक्तीने सोमवारी दुपारी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. चिठ्ठीत फेसबुकवर कोमल शर्मा नावाच्या महिलेने त्यांच्यासोबत ओळख केली. त्यानंतर अश्लील व्हिडिओ कॉल करून त्याचे चित्रीकरण केले. सुरुवातीला ती चित्रफीत यूटय़ूबवर अपलोड करण्याची धमकी मृत व्यक्तीला देण्यात आली. त्यानंतर त्याप्रकरणी दिल्ली गुन्हे शाखेत गुन्हा दाखला असून तोतया पोलीस अधिकारी प्रेम प्रकाश याने मृत व्यक्तीला धमकावले. या सर्व प्रकरणाला घाबरून त्या व्यक्तीने आरोपींना दोन लाख रुपयांची खंडणी दिली होती.