रायगड : रायगड जिल्हा हा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळांमुळे राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. वर्षभर हजारो देशी-विदेशी पर्यटक रायगडला भेट देत असले, तरी अनेक ठिकाणी पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागते किंवा समुद्रातील किल्ल्यांपर्यंत जाण्यासाठी भरती-ओहोटी आणि बोटीची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आता पर्यटकांची ही अडचण मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवी गती देण्यासाठी राज्य सरकारने पाच महत्त्वाच्या रोप-वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये रायगडमधील प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला असून एलिफंटा, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, रायगड किल्ल्याचा पायथा ते रायगड किल्ला आणि अलिबागमधील श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगर या पाच ठिकाणी आधुनिक रोप-वे सेवा उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून पर्यटनाचा अनुभवही अधिक आनंददायी होईल. विशेष म्हणजे समुद्रातील ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी यापुढे भरती-ओहोटीची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. अलिबाग किनाऱ्यावरून थेट रोप-वेने किल्ल्यावर पोहोचता येणार असल्याने पर्यटकांचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. त्याचप्रमाणे नेरळ ते माथेरान हा प्रवासही अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
रायगड किल्ला आणि श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगरावर रोप-वे सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग तसेच शारीरिक अडचणी असलेल्या भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कठीण चढाई न करता ते सहजपणे या ठिकाणी पोहोचू शकतील. केंद्र सरकारच्या ‘पर्वतमाला’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ४५ हून अधिक रोप-वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. यापैकी १६ प्रकल्प राज्य सरकारमार्फत, तर उर्वरित २९ प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. रायगडमधील या पाच प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर आता सविस्तर प्रकल्प आराखडा, पर्यावरणीय मंजुरी, तांत्रिक तपासणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यटकांची संख्या वाढण्यासोबतच स्थानिक रोजगार, पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, वाहतूक आणि इतर पूरक सेवांनाही मोठा फायदा होणार असून रायगडच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार आहे.






