पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील दोन बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन्ही बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी मालक व मॅनेजर अशा चार जणांना अटक केली आहे. तर, १८ कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान त्यामध्ये स्काय हाय तोलुशन या कंपनीचा मालक सागर कुमार यादव (वय ३२, रा. हिंजवडी), मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (वय २९, रा. वृंदावन सोसायटी, वाघोली) तसेच, टेक लॉ सोलुशन कॉल सेंटरचा मालक धनंजय साहेबराव कासार (वय २५, रा. माण, ता. मुळशी) व मॅनेजर हर्षद शंकर खामकर (वय २८, रा. सेल पेट्रोल पंपाजवळ, हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, या दोन्ही कॉल सेंटरमधील एकूण १८ कर्मचार्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.







